रात्रगस्तीदरम्यान केली कारवाई, आरोपी गाडी सोडून फरार…
अमळनेर:- गोपनीय माहितीच्या आधारे अमळनेर पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान कारवाई करत ५३ किलो गांजासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की, चोपड्याकडून अमळनेर शहराकडे चारचाकी वाहनातून गांजा आणण्यात येत आहे. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी अमळनेर पोलिसांच्या पथकाने जळोद रस्त्यावर सापळा लावला असता पहाटे १ वाजेच्या सुमारास एक चारचाकी व एक मोटारसायकल येत असल्याने पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी वाहने उलट्या दिशेने पळवली. पोलिसांनी पाठलाग सुरू करताच आरोपींनी गाडी खड्ड्यात टाकून पळ काढला. पोलिसांनी गाडीची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये आठ लाख दोन हजार किमतीचा ५३ किलो गांजा आढळून आला. तसेच आरोपींनी केलेली सोडून दिलेली मोटारसायकल व चारचाकी मोबाईल यांच्यासह एकूण बारा लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एका सराईत आरोपीची ओळख पटली असून याप्रकरणी अमळनेर पोलीसात अंमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.