संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत डॉ. आशुतोष पाटील यांचे मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात दि. 22 नोव्हेंबर रोजी आजीवन विस्तार विभाग, कबचौ उमवि जळगांव व इंग्रजी विभाग, कला महाविद्यालय मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून, विद्यापीठाच्या आजीवन विस्तार विभागाचे संचालक मा. प्रा. डॉ. आशुतोष पाटील हे होते. कार्यशाळेचे साधनव्यक्ती म्हणून प्रा. डॉ. नितीन बारी माजी व्यवस्थापन समिती सदस्य, कबचौ उमवि जळगांव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम विकास शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे हे उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात भारतमातेची प्रतिमा पूजन, गीत गायन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागत समारंभाने करण्यात आली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयाला व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घ्यायला संधी दिली त्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले, तसेच अल्पावधीत महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा चढता आलेख मांडला. प्रमुख अतिथींचा परिचय कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील यांनी करून दिला. कार्यशाळेचे उद्घाटक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक आव्हानं पेलण्यासाठी सज्ज व्हावे. पदवी अभ्यासक्रमाबरोबरच व्यक्तीमत्व विकास होणं गरजेचं आहे, त्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम होवून स्वतः मधील स्व:त्वाला ओळखला शिका आणि आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे यांनी जिवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखला शिकावं तसेच संवाद कौशल्य व देहबोली विकसित करण्यावर भर दिला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कार्यशाळेचे साधन व्यक्ती प्रा. डॉ. नितीन बारी सरांनी संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यक्तिमत्व विकासातील विविध पैलू तसेच घटक यावर सविस्तर भाष्य केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून कुशल, हजरजबाबी आणि सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व कसे असावे, ते आत्मसात करण्यासाठी विविध मार्ग आणि पद्धतीविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे सुत्रसंचलन कु. नाजमिन पठाण हिने तर आभारप्रदर्शन कार्यशाळेचे सह-समन्वयक प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी केले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तद्नंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले गेले. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.