मारवड महाविद्यालयात प्रतिमा पूजन, तर देवगाव देवळी येथे वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन…
अमळनेर:- तालुक्यात विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात “प्राध्यापक प्रबोधिनी” विभागाच्या वतीने राज्यघटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय, नवल नगर, जि. धुळे येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. के. डी. बागुल हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. के. डी. बागुल यांनी डॉ. बाबासाहेबांची भारतीय लोकशाही बद्दलची विचारसरणी, त्यांचे राजकीय व आर्थिक विचार, त्यांच्या तसेच दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्रा. व्हि. डी पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे कायदा मंत्री व सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
देवगाव देवळी शाळेत वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन…
तालुक्यातील देवगाव देवळी शाळेत राज्यघटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय अन्याय आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रतिमेचे पूजन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले.
शाळेत वत्कृत्व स्पर्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर घेण्यात आल्या. त्यात आठवी ते दहावीतील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला परीक्षक म्हणून एच.ओ माळी यांनी काम पाहिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर शिक्षक एच ओ. माळी,व एस के महाजन यांनी आपले मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.