पातोंडा येथे लोकसहभागातुन बसवणार सीसीटिव्ही यंत्रणा…
पातोंडा ता.अमळनेर:- अमळनेर शहरातील बहुतांश भागांमधे सीसीटीवी कॅमे-यांचे जाळे विणले गेल्याने शहरातील गुन्हगारीचे प्रमाण 75 टक्क्यांनी घटले आहे. परंतू शहरात सीसीटीवी कॅमेऱ्यांचा वचक बसल्याने गुन्हेगारांचा कल ग्रामीण भागाकडे वाढल्याने ग्रामीण भाग सुरक्षीत करण्यासाठी ग्रामीण भागात लोकसहभागातुन व ग्रा पं 15 व्या वित्त आयोगातुन सीसीटीवी व्यवस्था उभारण्या करीता ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन याकरीता दत्त मंदिर येथे संपन्न झालेल्या बैठकीत पोलीस उपअधिक्षक राकेश जाधव यांनी केले.
ग्रामीण भागात सीसीटिव्ही व्यवस्था उभारल्यास खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे, मोटर सायकल चोरी, पशूधन चोरी, मुलींची व महिलांची छेडखानी, निवडणुकांमधील व दहावी बारावी परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार, लहान मुलांच्या व वृध्दांच्या समस्या, ट्रॅक्टर व इतर साहित्य चोरी आदी गुन्ह्यांना आळा बसुन सामाजिक सलोखा राखला जाईल याबाबत पहिल्यांदाच पोलीस प्रशासनात व ग्रामस्थांमधे संवाद साधण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील किरण शिंदे यांनी गावात सीसीटिव्ही व्यवस्था उभारण्यास लागणारी सर्व ऑप्टीकल फायबर, ट्रान्समीटर, हार्ड डीस्क, डीव्हीआर देणार असल्याचे जाहिर केले. संपुर्ण गावात लवकरच सीसीटिव्ही व्यवस्था उभारण्यात येईल अशी ग्वाही उपस्थित शरद शिंदे, घनशाम पाटील, संदिप लोहार, अशोक गालापुरे, राजेंद्र वाणी, संभाजी बोरसे, विजय पवार, निवृत्ती सुतार, तुकाराम बिरारी, अमोल चौधरी, किशोर पाटील, रत्नाकर पवार, राहुल चौधरी, सरपंच भरत बिरारी, ग्रा.पं. सदस्य सोपान लोहार, विकासो संचालक किशोर मोरे, कपील पवार (लेखा व वित्त अधिकारी), भुपेंद्र बाविस्कर, रघुनाथ संदानशिव, युवराज संदानशिव, भिकनराव सोनवणे यांच्यातर्फे देण्यात आली.
प्रतिक्रिया
“ग्रामीण भागात सीसीटीवी व्यवस्था उभारल्यास गुन्हेगारीला, मुलींच्या व महिलांच्या छेडखानीस आळा बसेल व निर्दोष लोकांच्या सामाजिक बदनामीस सामोरे जावे लागणार नाही. पातोंडा सह तालुक्यातील 55 गावांनी 15 व्या वित्त आयोगात यासंबंधी तरतूद केली आहे.” – राकेश जाधव, पोलीस उपअधिक्षक अमळनेर
“सरपंच, उपसरपंच व ग्रा पं सदस्यांनी पुढाकार घेऊन 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधित खर्चातुन गावात सीसीटीवी व्यवस्था उभारण्यास साडेतीन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकसहभाग व ग्रा.पं. यांच्या संयुक्त विद्यमाने गावात लवकरच सीसीटीवीचे जाळे विणले जाईल.”
– बी वाय पाटील,
ग्रा. वि. अधिकारी, पातोंडा