अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून वाहतूक ठप्प, पिकांचे नुकसान…
अमळनेर:- काल संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळ वाऱ्यासह गारपिटीने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले आहेत.
काल दिनांक २८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपूर्ण तालुक्यात वादळ वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर विजेच्या कडकडाटासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गार पडली. बोरी काठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गार पडली असून घराचे व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. धार ते मारवड तसेच करणखेडा रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण भागात अनेक घरांची पत्रे उडून गेली असून झाडे घरांवर पडून घरांचे नुकसान झाले आहे. तसेच पशुधनाचे ही नुकसान झाले आहे. यात उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ज्वारी, बाजरी, मका ही पिके आडवी झाली आहेत. तालुक्यात कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी मात्र झाली आहे.