
रेशन दुकान महसूलकडून सील, धान्यासह वाहन पोलीसात जमा…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील वि.का.सो. आवारातील स्वस्त धान्य दुकानाचा माल खाजगी वाहनात भरत असताना ग्रामस्थांनी रात्री ११ च्या सुमारास पकडला.
मारवड वि.का.सो. आवारात रेशन दुकान क्रमांक 105 व 106 असून दिनांक २६ रोजी रात्री ११ च्या सुमारास खाजगी पॅजिओ क्रमांक जीजे ०५ बिव्ही ४८२९ क्रमांकाच्या गाडी धान्याच्या गोण्या भरत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. त्यावेळी ग्रामस्थांनी गाडी मालक, तांदुळाच्या गोण्या व वजन काटा रंगेहात पकडला. ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल वाघ यांना माहिती फोनवर कळविली असता रात्री तालुका पुरवठा अधिकारी संतोष बावणे, गोडाऊन अधिकारी पाटील, तलाठी भावसार यांनी भेट देत रेशन दुकान सील केले. तसेच धान्याची गाडी मारवड पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील कार्यवाही पंचनामा करून करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. यावेळी रात्री ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
प्रतिक्रिया:-
रात्रीचा सुमारास धान्याच्या वाहनासह साहित्य मारवड पोलीसात जमा केले असून रेशन दुकान सील केले आहे. आज रेशन दुकानाची चौकशी करून अनियमितता पाहिली जाऊन पुढील कारवाई केली जाईल.
:- संतोष बावणे, पुरवठा अधिकारी, अमळनेर







