अमळनेर:- देशात सुमारे २४ लाख अंगणवाडी कर्मचारी आणि सुमारे ११ लाख आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला करू गेली अनेक वर्षे गाव पातळीवर आरोग्य आणि पोषण तसेच कुपोषण दूर करण्यासाठी सततपणे अत्यंत महत्वपूर्ण काम करीत आहेत.
परंतु ह्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाची उदासीन भुमिका आहे.अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अत्यंत अल्प मानधन आणि मोबदला दिला जातो.त्यांना नोकरीची कोणतीही शाश्वती नसुन भविष्यही नाही.म्हणून त्यांचे कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन लागू करण्यात यावे. सेवासमाप्तीनंतर त्यांना उदारनिर्वाहासाठी दरमहा पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय करावा. याचा आग्रह धरण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभे करण्यासाठी विचारविनिमय करीता देशातील अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची श्रीमती माया परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली जंतर मंतर दिल्ली येथे नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये मध्यवर्ती सरकारच्या अर्थ संकल्पिय अधिवेशन काळात दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करण्यावर एकमत करण्यात आले.
या देशव्यापी बैठकीत श्रीमती माया परमेश्वर,रामकृष्ण बी.पाटील(महाराष्ट्र), श्रीमती शाहिदा खान(राजस्थान),चंदा यादव (उत्तर प्रदेश),पार्वती आर्य (मध्य प्रदेश), श्री.सैय्यद (गुजरात) यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. सदर बैठकीत श्रीमती सलमा सुलताना,श्रीमती संतोष शर्मा,श्रीमती रेखा शर्मा, श्रीमती ममता चक्रधारी,श्रीमती उर्मिला सिंह,श्रीमती नसीम बानो, श्रीमती वनिता देशमुख,सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे यांच्यासह विविध राज्यांतील अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनांच्या प्रतिनिधीं उपस्थित असल्याची माहिती रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.