गाडीतून 17 प्लेट केल्या जप्त, जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई…
अमळनेर:- पाडळसरे धरणाच्या कामावरील साहित्याची चोरी करणारे चौघे जळगाव पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 918 किलो वजनाच्या 17 प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी जळगाव येथील मानराज पार्क भागात इंडिका गाडी क्रमांक एमएच १९ क्यू ४७६० भरधाव वेगात जाताना दिसल्याने जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे हवालदार गणेश पाटील, शिपाई समाधान पाटील यांनी गाडी अडवली असता त्यात लोखंडी प्लेट दिसून आल्या. त्यांच्या चौकशी करताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीस ठाण्यात नेले असता त्यांनी ह्या प्लेट पाडळसरे धरणाच्या साईटवरून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांची नावे ज्ञानेश्वर सोपान कोळी, मिथुन निरामण गोसावी, लखन एकनाथ सपकाळे, विष्णू श्रीधर कोळी अशी असून सर्व राहणार शेळगाव ता. जि. जळगाव येथून असल्याचे सांगितले. अमळनेर तालुक्यातील कळमसरे रस्त्यावरील पाडळसरे धरणाच्या कामासाठीचे साहित्य ठेवले असून त्या ठिकाणावरून ४ लक्ष ६४ हजार ९४० रुपये किमतीच्या एकूण वजन १५ टन ६१२ किलो वजनाच्या २८७ नग लोखंडी प्लेट चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. जिल्हा पेठ पोलिसांनी मारवड पोलिसांशी संपर्क साधून मुद्देमाल व आरोपी मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.मारवड पोलिसांनी अटक झालेल्या चारही आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केल्यावर न्यायमूर्ती श्रीमती एस एस जोंधळे यांनी वरील चारही आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.