
अमळनेर:- येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिराची ख्याती आता देशभरातच नव्हे तर जगभरातही सर्वदूर पसरली आहे.
जगप्रसिद्ध शिवपुराणकार पंडित प्रदीप मिश्रा हे मालेगाव येथील कथा समाप्तीनंतर श्री मंगळग्रह मंदिर येथे भेट देणे सुनियोजित झाले होते. मात्र अलोट गर्दी व सुरक्षेच्या कारणास्तव ऐन वेळी त्यांची मंदिर भेट रद्द झाली. मात्र पंडितजींनी त्यांच्या तर्फे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या पथकावर एक अलौकिक बेलपत्र मंदिरात वाहण्याची जबाबदारी दिली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने मंदिरात येऊन विधीवतरीत्या पंडितजींनी पाठविलेले बेलपत्र देवाला वाहिले. या कामी सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांनी सहकार्य केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर यांनी बेलपत्र आणणाऱ्या पथकाचे स्वागत केले. मंदिराचे पुजारी जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले.







