रक्तरंजित वाळू…
मांडळ येथील घटना, दोषींवर कारवाईसाठी मृतदेह आणला थेट तहसील कार्यालयात…
सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, दोघांना अटक, पोलिसांच्या आश्वासनानंतर झाले अंत्यसंस्कार…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे पाच दिवसापूर्वी रात्रीच्या अवैध वाळू चोरीमुळे रस्ता खराब होतो म्हणून सांगणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा वचपा काढत दिनांक १६ च्या रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या गुप्तांगावर फावड्याने मारहाण करीत अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने संगनमताने त्याचा खून केल्याची घटना दिनांक १७ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी मृतदेह धुळ्यावरून थेट तहसील कार्यालयात आणून कुटुंबियांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. रात्री ७ वाजता दोन आरोपींना मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने व त्यांच्या पथकाने अटक केल्यावर जमावाला शांत करत डीवायएसपी राकेश जाधव यांच्या आश्वासनाने रात्री उशिरापर्यंत मांडळ गावी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अवैध वाळू वाहतुकीबाबत विरोध केल्याने त्यातून हा खून झाल्याची तालुक्यात चर्चा असून, दिनांक ११ च्या रात्री वाळू चोरून नेणारे ट्रॅक्टर चालक, मयत शेतकऱ्यात व अशोक लखा कोळी यांच्यात वाद झाला होता यावेळी मयताने शेतीच्या वहिवाट रस्त्याने ट्रॅक्टर नेण्यास विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर चालक यांनी दिनांक १६ च्या रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी गेलेल्या जयवंत कोळी याला फावड्याने गुप्तांगावर मारहाण करीत अंगावरून ट्रॅक्टर चालवून खून केल्याची घटना दिनांक १७ रोजी सकाळी ७:३० ला उघडकीस आली. नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यास थेट धुळे येथे जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सकाळी १०:३० वाजता पोलिसांना खबर मिळताच डीवायएसपी राकेश जाधव, मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील, हवालदार सुनील अगोने, फिरोज बागवान घटनास्थळी धाव घेतली. लागलीच जळगाव येथून श्वानपथक प्रमुख राठोड व फोरेन्सिक तज्ञ अनिल बडगुजर, डॉली या श्वानाला घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी जागेवरून नमुने घेतले, मयत जयवंत कोळीची पत्नी शुभांगीने दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात अशोक कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, विनोद कोळी, रोहन पारधी व पिंटू शिरपूरकर या सहा जणांवर संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेतील दोषींवर कारवाई करावी त्वरित अटक करण्यासाठी सायंकाळी मृत जयवंत कोळीचा मृतदेह धुळ्यावरून थेट नातेवाईकांनी मयत शेतकऱ्याचा मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात नेल्याने खळबळ उडाली.
जयवंत याचा खून झाला आहे त्याचा जीव घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कुटुंबीयांनी थेट जयवंत याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अमळनेर तहसील कार्यालयात नेला. जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही असा आक्रमक पवित्रा मयत जयवंत यांच्या नातेवाईकांनी घेतला. यावेळी मयत जयवंत यांची पत्नी तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान नातेवाईकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन जणांना मारवड पोलिसांनी अटक केली, इतरांनाही अटक केली जाईल असे आश्वासन डीवायएसपी राकेश जाधव, पीआय शिंदे यांनी दिल्यावर नातेवाईकांनी जयवंत याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला व रात्री उशिरा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.
अवैध वाळूने घेतला एक बळी, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असून याकडे महसून प्रशासन का डोळेझाक करून आहे यावर प्रश्नचिन्ह असून अर्थपूर्ण व्यवहारांची हात बांधले गेल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. लोकप्रतिनिधींनी ही महसुलच्या या कारभाराकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा प्रशासनावर वचक आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका अवैध धंद्याचे माहेरघर बनत चालले असून गोड बोलून आपली तुंबडी भरून घेण्यात पटाईत असलेल्यांच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करावर वचक राहिला नसून महसूल व प्रशासनाच्या ढिलाईमुळे वाळू माफियांची खून करण्यापर्यंत मजल गेली आहे. या खुनात आरोपीसह मलिदा खाणाऱ्यांचे ही हात रंगले आहेत.