वीटभट्टीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात मागणी…
अमळनेर:- वीटभट्टीसाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २७ हजार ५०० रुपये लागतील असे सांगून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने पकडले.
सोमवारी दिनांक २३ रोजी दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाने रक्कम स्वीकारताच तक्रारदार यांनी जोरात शिंक देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील असे अटकेतील ग्रामसेवकाचे नाव आहे. म्हळसर ता. शिंदखेडा येथील मूळ रहिवासी असलेले तक्रारदार ज्ञानेश्वर कुंभार (नाव बदललेले आहे) यांनी निम गावी शेतीसह वीट भट्टीचा व्यवसाय थाटून कायमस्वरूपी वास्तव्य करून आहेत. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी लागणार नाहरकत दाखल्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांच्याकडे मागणी केली. त्या मोबदल्यात ग्रामसेवकाने २७ हजार ५०० रुपये मागणी केली , ग्रामसेवक अवास्तव रक्कम मागत असल्याने तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचा सुमारे मागील 30 वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीटभट्टीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसील कार्यालय, अमळनेर यांच्या नावे सहा हजार रुपयांची रॉयल्टी भरल्यानंतर आरोपी ग्रामसेवकाने निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगून दाखल्याच्या मोबदल्यात 17 व 23 जानेवारी रोजी 27 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती व 25 हजारांत तडजोड झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत पाटील यांनी सांगितलेल्या कोडवर्डनुसार सोमवारी दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाने रोख २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच तक्रारदार यांनी जोरदार शिंक देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकून मुद्देमालसह ग्रामसेवक राजेंद्र पाटील यास ताब्यात घेतले. मारवड पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र प्रत्येक विट भट्टी चालकाकडून रक्कम घेत पावती देवून ग्रामनिधीत ती रक्कम जमा केली जाते व तश्या ग्रा.पं.च्या नावे पावत्या ही असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एसीबीने एका पदाधिकाऱ्याला ही उचलून नेल्याची माहिती असून चौकशीअंती हे प्रकरण स्पष्ट होणार आहे.
हा सापळा जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे तसेच पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींनी यशस्वी केला. त्यांना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.