ग्रामस्थांनी पकडुन दिले वाळूचे ट्रॅक्टर, चालक मालक फरार…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे वाळू प्रकरणातून एकाचा बळी गेल्यानंतर काही दिवस उलटताच पुन्हा वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू झाला असून आता ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेत ट्रॅक्टर पकडुन दिले आहे.
याप्रकरणी तलाठी राजेंद्र दाभाडे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, १० फेब्रुवारी रोजी रात्री तहसिलदारांनी दाभाडे यांना फोनद्वारे ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पकडल्याची माहिती दिल्याने त्याठिकाणी भेट दिली असता एक निळ्या रंगाचे सोनालीका कंपनीचे विना क्रमांकाचे एक ब्रास वाळु भरलेल्या स्थितीत आढळुन आले. तेथे उपस्थित असलेले सरपंच विजय नथ्थु पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, वाळुबंदी अध्यक्ष सुरेश लोटन कोळी यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, सदर ट्रॅक्टर चालक हा ज्ञानेश्वर प्रकाश कोळी (रा मांडळ) व मालक योगेश हिलाल कोळी व गोकुळ बापु शिरसाठ (दोन्ही रा मांडळ) असे असून यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता पांझरा नदी पात्रातुन बेकायदेशीर वाळू वाहतुक करताना मिळुन आल्याने ग्रामस्थांनी ट्रॅक्टर जमा केले. यावेळी चालक व मालक फरार झाले. सदर ठिकाणी पंचनामा करून अडीच लक्ष रुपये किंमतीचे निळया रंगाचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर लाल रंगाची ट्रॉली व साडे चार हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा मुद्देमाल मारवड पोलीसात जमा करण्यात आला असून आरोपींविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना भरत गायकवाड हे करीत आहेत.