आज श्री. प्रसाद महाराज विधीवत पूजा करून करणार मूर्ती पुनर्स्थापित…
अमळनेर:- अमळनेर पारोळा रोडवर सडावण जवळील मानाच्या दत्तमंदिरातील चोरीस गेलेली मुख्य मूर्ती अमळनेर पोलिसांच्या कार्यतत्परतेने परत मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा रोडवर सडावण गावाच्या अलीकडे मानाचे देवदत्त छोटे मंदिर असून काल दि.१२ रोजी या मंदिरातील श्री. दत्त महाराज यांची दगडाची मुख्य मूर्ती चोरी झाली झाल्याची माहीती समजताच सकाळी ६:४५ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पीएसआय विकास शिरोळे, पीएसआय नरसिंह वाघ, पीएसआय अनिल भुसारे, पोलीस अंमलदार सुनिल पाटील, डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, लक्ष्मीकांत शिंपी, बापू साळुंखे, चालक सुनिल पाटील, पोशि योगेश बागुल हे स्पाॅटवर पोहोचले. मंदिराचे आताचे व माजी पुजारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील व महेश जाधव यांच्याकडून देखील माहिती घेतली. त्यावरून लागलीच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस पथक तयार करून रवाना केले. त्याप्रमाणे तपास पथकाने शोध घेण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने सडावण ते रत्नापिंप्री गावाच्या दरम्यान असलेल्या शेतात चोरीस गेलेली ही मूर्ती मिळून आली. मूर्ती विधिवत ताब्यात घेऊन मंदिरात ठेवली आहे. कोणाचीही यांची तक्रार नसल्याने कोणतीही नोंद करण्यात आली नाही. पोलीसांनी तात्काळ दखल घेतली श्री. दत्त महाराज यांची मूर्ती आणली म्हणून गावातील भक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती कौतुक व्यक्त केले. श्री. दत्त महाराज यांची मूर्तीची आज दि.१३ रोजी श्री. संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चना करून मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे.