
२४ फेब्रुवारीला करणार अर्ध नग्न आंदोलन…
अमळनेर:- नाशिक विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ फेब्रुवारीला अर्ध नग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा निवृत्त सहाय्यक सुरेश पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांची बैठक नुकतीच संपन्न होऊन त्यात महाराष्ट्र नागरी सेवा वेतन अधिनियम १९८२ च्या नियम १५ अन्वये सर्व १३ संवर्गातील कर्मचाऱ्यांना पद नामांतर करून समकक्ष अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १ जानेवारी १९८९ ला समाविष्ट करून त्यानुसार वेतन निश्चिती करावी. १ ऑक्टोबर १९९४ पासून पहिला कालबद्ध पदोन्नती लाभ मिळावा. ऑक्टोबर २००६ पासून ३१ मार्च २०१० पर्यंतचा फरक रोखीने मिळावा या मागण्यांसाठी शि. ल. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अर्ध नग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक विभागीय कार्यालय, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर आदी प्रादेशिक कार्यालयात देखील एकाच वेळी अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुरेश पाटील यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.







