तत्कालीन सचिवाविरुद्ध लेखापरीक्षकाने दिली फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांच्या कर्ज रकमेच्या अपहारप्रकरणी मारवड पोलीसात शासनाच्या वतीने लेखापरीक्षकाने फिर्याद दिली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, अप्पर लेखापरीक्षक भिकण पाटील यांनी मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण केले असता सचिवाने कर्जदाराच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. त्यात एकूण रू. २१,४५,३३२ रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यात ७,९६,९३४ रकमेचा तात्पुरता अपहार व १३,४८,३९८ रकमेचा कायमस्वरूपी अपहार केल्याचा अहवाल सादर केला आहे. एकूण अपहार रकमेपैकी १२ कर्जदारांची रक्कम सचिवाने भरली असून व ७ कर्जदारांची कर्जाची मुद्दल रक्कम १३,४८,३९८ व त्यावरील व्याज भरणे बाकी आहे. या सर्व बाबींचा विचार करता तत्कालीन सचिव वसंतराव पुरुषोत्तम पाटील याने कर्जदार सभासदांच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून संस्थेचा व सभासदांचा विश्वासघात केला आहे. या पूर्ण आर्थिक गैरव्यवहारास सचिव हेच जबाबदार असल्याने शासनाच्या वतीने लेखापरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ४२० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.