गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचा पो.नि. विजय शिंदे यांचा इशारा…
अमळनेर:- शहरातील गुन्हेगारीत अतिशय आक्रमक पद्धतीने सक्रिय असणारे गुन्हेगार दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ तसेच शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख या दोघांवर नाशिक रोड सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्धेची मोठी कारवाई केल्यानंतर आणखी एका गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.
अमळनेर पोलिसांनी विशाल विजय सोनवणे याच्यावर एमपीडीएची कारवाई केली असून त्यास नागपूर सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले. विशाल याच्यावर आज पावतो एकूण 13 गुन्हे दाखल असून त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात व अमळनेर मध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच अनेक अदखलपात्र अपराध अमळनेर पोलीस स्टेशनला देखील दाखल आहेत.
त्याच्यावर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने मोटर सायकल चोरी करणे, महिलेचा विनयभंग करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, हिंदू मुस्लिम सारखे जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, लोखंडी फायटर मारून पिस्टल कपाळाला लावून जबरी चोरी करणे, जीवे ठार मारण्याचे ३ गुन्हे देखील दाखल आहेत. तो हद्दपार करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मनोदय देखील काही कुटुंबांनी बोलवून दाखविला होता. त्याच्यावर अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या लोकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यात अमळनेर शहरातील अट्टल तीन गुन्हेगारांवर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या अमळनेरकरांकडून स्वागत करण्यात येत असून या कारवाईत प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार किशोर पाटील, शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे व महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती अक्षदा इंगळे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वना पाटील, चालक पोलीस हवालदार मधुकर पाटील, चालक पोलीस शिपाई सुनील पाटील, संदेश पाटील, हितेश चिंचोरे, मिलिंद भामरे, या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांची मदत व पाठपुरावा लाभत असून तसेच त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे. जनतेस त्रास देवून वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांना परिणामकारक कारवाई केली पाहिजे अशी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची तीव्र इच्छा असून अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया:-
जनतेस वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांनी वेळीच सावध होऊन आता एकही गुन्हा करू नये अन्यथा त्यांच्यावर यापेक्षाही मोठी व कडक कारवाई करण्यात येईल. :- पो. नि. विजय शिंदे