
आत्मनिर्भर युवती अभियानात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन…
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व (कै) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवशीय आत्मनिर्भर युवती अभियान या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे सहावे पुष्प गुंफतांना प्रताप महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रोफेसर डॉ. कल्पना पाटील मॅडम म्हणाल्या की, आज समाजात वावरत असताना स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. कारण 21 व्या शतकातील आधुनिक युगाची कास धरत असताना आपणही व्यक्तिमत्व विकासासह विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना केले.
तसेच महिला बचत गटाच्या प्रवक्त्या वैशाली साळुंखे यांनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना महिला बचत गट व विविध स्वयंरोजगारांबाबत बँकेच्या विविध योजनांची माहिती देत युवतींना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कुठल्याही उद्योगाची सुरुवात करत असताना अगदी छोट्या उद्योगापासून जरी सुरुवात केली तरी भविष्यात तो एक मोठा उद्योग म्हणून नावारूपास येऊ शकतो म्हणून युवतींनी विविध शासकीय योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय वसंतराव देसले सर म्हणाले की, विद्यार्थिनींनी अशा मार्गदर्शनपर शिबिरांमधून माहिती घेऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व स्वावलंबी बनवावे शासनाच्या ज्या विविध योजना महिलांसाठी आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती नसल्याने आपण त्यांच्या लाभापासून वंचित राहत असतो परिणामी आपण स्पर्धेतून मागे पडतो .विद्यापीठाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून आपणास त्याचा नक्कीच फायदा होईल असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी आलेल्या व्याख्यात्यांचा महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील व महाविद्यालयाच्या युवतीसभा प्रमुख प्रा. डॉ.नंदा कंधारे यांनी स्वागत व सत्कार केला. प्रा. किशोर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी महाजन हिने तर आभार मनीषा बेलदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचाऱ्यांसह जावेद मणियार,प्रताप भिल, गणेश मोरे यांनी परिश्रम घेतले.







