
धुळे:- २६ मार्च रोजी सुरत (गुजरात) येथील शिवप्रेमींनी धुळे शहराजवळील किल्ले लळींग वर महाश्रमदान व स्वच्छ्ता मोहीम राबवली.

या आधी महाराष्ट्रातील गडकिल्यावर अनेक मोहिमा पार पाडल्या आहेत. सुरत शहरातील सर्व महापुरुषांची स्मारके दर रविवारी नित्य नेमाने स्वच्छ करून त्याचे पावित्र्य जपत असतात. दिनांक २६ मार्च रोजी किल्ले लळिंग वर सकाळी ९ वाजता गडपूजन व मुख्य प्रवेशद्वाराला पुष्पहार घालून भंडारा उधळत, तिथूनच मशाल पेटवत थेट गडावर भवानी मंदिरात घेऊन जाऊन मंदिर परिसर स्वच्छता करून भवानी मातेला पुष्पहार पूजा अर्चा करून आरती करण्यात आली. स्वच्छता संकल्पना मोहीमेस सुरवात करण्यात आली. व परिसरात पर्यटकांनी केलेली घाण, बाटल्या, प्लॅस्टिक, पाण्याच्या टाकी मधील घाण कचरा साफ करत सर्व कचरा खाली आणून त्याची विल्हेवाट लावत मोहीमेची सांगता केली. स्वच्छता मोहिमेस हजर राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व विशेष सहकार्य म्हणून किल्ले लळींग संवर्धन समिती तर्फे त्याचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.







