अमळनेर:- येथील दिनांक १४ जुलै रोजी कृषी विभागाची उपविभाग स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर बी चलवदे, जिल्हा कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी डी व्ही जाधवर यांनी केले. पिकांवरील किडी व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रॉप सॅप प्रकल्पाची सविस्तर माहिती व खरीप हंगामातील नियोजन याविषयी माहिती दिली. कार्यशाळेला अमळनेरसह चोपडा, पारोळा, एरंडोल व धरणगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चलवदे यांनी सांगितले की, खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे किडी व रोगांचे सर्वेक्षण करताना अचूक माहिती भरावी जेणेकरून किडीपासून होणारे संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येईल तसेच पी एम किसान योजनेचा पुढील देय असलेला हप्ता पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी प्रलंबित असलेले ई केवायसी व आधार सिडींग तात्काळ पूर्ण करावेत, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत एक रुपया भरून सहभाग नोंदविता येत असल्यामुळे 100% शेतकरी कसे सहभागी होतील याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. बाहेती यांनी कापूस व इतर पिकातील किडी व रोगाचे नियंत्रण याविषयी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत निरीक्षणाचे प्रशिक्षण व येणाऱ्या अडचणी याविषयी मंडळ कृषी अधिकारी मुकेश सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. कापूस व मका पीक व्यवस्थापन त्यावरील कीड व रोग, त्यांची ओळख व त्यांचे नियंत्रण तसेच आकस्मिक मर, बोंडसड याविषयी कृषी सहायक दिनेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्राजक्ता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी सोनाली सोनवणे यांनी केले. यादरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे यांनी शहरातील वैष्णवी झेरॉक्स या ई सेवा सेंटरला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व पिक विमा भरताना कोणत्याही स्वरूपाचे शुल्क केंद्र चालकाला देऊ नये असे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. प्रधानमंत्री पिक विमा भरताना जिल्हाभरात शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशा सक्त सूचना केंद्र चालकांना दिल्या आणि पीएम किसान योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकरी अरुण मन्साराम पाटील रा.रनाईचे यांचे ई केवायसी स्वतः पूर्ण केले व उपस्थितांना आपले ई केवायसी व आधार सिडिंग प्रथम प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीमती सोनाली सोनवणे व प्रविण पाटील उपस्थित होते.