अमळनेर न्यायालयाचा निर्णय, वैजापूर येथे घडली होती घटना…
अमळनेर:- चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे दोन बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा काल अमळनेर न्यायालयाने सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर ता. चोपडा येथे १३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ८:३० वाजता तीन आदिवासी बालिका शौचाला जात असताना आरोपी देवेंद्र राजेंद्र भोई (मोरे) याने तिघांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक बालिका आरोपीच्या हाताला झटके देवून पळून आली. मात्र दोन बालिकांना त्याने अंधारात नेवून पाशवी अत्याचार केला. त्यावेळी बालिकांचा आरडाओरड ऐकून साक्षीदार सुरमल बरेला व त्याची पत्नी हे आले असता आरोपी पळून गेला. व दोन्ही बालिका त्याठिकाणी गंभीर अवस्थेत पडलेल्या दिसून आल्याने त्यांनी त्यांना घरी आणत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानतंर जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर अमळनेर न्यायालयात याबाबत वेळोवेळी सुनावणी होवून साक्षीदार व पुरावे तपासण्यात आले. दिनांक २८ रोजी पुरावे ग्राह्य धरून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकारी वकील आर बी चौधरी यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले.