अमळनेर:- रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर तसेच विनाकारण घोळक्याने चौकांत फिरणाऱ्यांवर अमळनेर पोलिसांची कारवाई सुरू झाली असून दहा जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी विविध प्रकारच्या कारवाई करून गुन्हेगारांना दहशत घातली आहे. शहरातील शांतता व स्वास्थ्य टिकावे म्हणून त्यांनी आणखी एक कारवाईचा उपक्रम पाठपुराव्याने हाती घेतला आहे. त्यामुळे शहरात रात्रीच्या टवाळखोरांवर देखील नियंत्रण आले आहे. शहरात जे लोक रात्री 10 वाजेनंतरही दुकाने, हॉटेल्स, हातगाडे, स्टाॅल्स, आस्थापने चालू ठेवतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या पाच दिवसांत अमळनेर येथील पीएसआय अक्षदा इंगळे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यांनी केलेल्या कारवाईत अमळनेर कोर्टात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (W) च्या 10 केसेस मधे सुनावणी होवून प्रत्येकी 500/रुपये दंड प्रमाणे एकूण 5000/- रु. दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे रात्री 10 वाजेच्या नंतर आस्थापना बंदची कारवाई करण्यात येत असून कोणीही रात्री घोळक्याने चौकांत व रस्त्यावर विनाकारण थांबू नये, सर्वांनी नियम पाळावेत असा इशारा वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिला आहे.