नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडयातील माहिजीदेवी देवस्थानाचा समावेश…
अमळनेर:- मतदारसंघात जनहितार्थ विकास कामांसोबतच धार्मिक देवस्थानांचाही कायापालट व्हावा या उद्देशाने तालुक्यातील दोन देवस्थांनाना ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत निधीस मंजुरी मिळविण्यात आ.अनिल भाईदास पाटील यांना यश आले असून या योजनेंतर्गत नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडा येथील माहिजी देवी मंदिर ही दोन देवस्थाने विकसित केली जाणार आहेत.
नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल दोन कोटी तर पातोंडा येथील माहिजी मंदिरासाठी 60.86 लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे,याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे शासन आदेश नुकतेच दि 29 मार्च 2023 रोजी प्राप्त झाले असून ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत “ब” वर्ग ग्रामिण तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दोन्ही देवस्थानात ही होणार विकास कामे…
सदर निधीतून नंदगाव येथे श्रीराम मंदिरात 43 लक्ष निधीतून भक्त निवास बांधकाम,50.72 लक्ष निधीतुन संरक्षण भिंत बांधकाम,21.64 लक्ष निधीतून देवस्थान सुशोभीकरण,54.19 लक्ष निधीतून कंपाऊंड वॉल, 30.43 लक्ष निधीतून यज्ञ सभामंडप असे एकूण 2 कोटींची कामे होणार आहेत तर पातोंडा येथील माहिजी मंदिरात 48.69 लक्ष निधीतून भक्त निवास बांधकाम आणि 12.17 लक्ष निधीतून महिला व पुरुष शौचालय बांधकाम होणार आहे. असे ऐकून 60.86 लक्ष ची विकासकामे होणार आहेत.
गेल्या काही वर्षात नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडयातील माहिजी मंदिर यांचे प्रस्थ गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले असून भक्तांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ सुरू असते, त्यामुळे या देवस्थानांमध्ये सोइसुविधांची वाढ व्हावी अशी मागणी भक्तगणांमधून होत होती यामुळे या प्रश्नाकडे आ.अनिल पाटील यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत भरघोस निधी मंजूर करून आणल्याने दोन्ही देवस्थानांचे रूप बदलून याचा विस्तार अधिक वाढणार आहे, यामुळे भक्त गणांनी आमदार अनिल पाटील यांचे विशेष जाहीर आभार व्यक्त केले आहेत. दोन्ही देवस्थानांना निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार मा. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार व्यक्त केले आहेत.या मंजुरीसाठी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, कार्यकारी अभियंता श्री ढिवरे, उपअभियंता पी ए पाटील, कनिष्ठ अभियंता योगेश खांबोरे व दीपक बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले.