वृत्तांकन करण्यास पत्रकारास केला मज्जाव, जिल्हा विभाग नियंत्रकांची भेट…
अमळनेर:- येथील बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखाच्या मनमानी कारभार व उद्धट वागणुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत रोष व्यक्त केला.
आगार प्रमुख इम्रान पठाण हे मनमानी कारभार करतात, रजेच्या पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यावेळी ड्युटी नसतांना विनाकारण बसवून ठेवणे, रजेचा पगार व्यतिरीक्त मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करणे, हक्काच्या रजा न देणे, कर्मचाऱ्याच्या नात्यात मृत्यू झाल्यास रजा न देता कामावर येण्यास आदेश देणे,पगार कपात का केला म्हणून विचारले म्हणून कामावरून काही कालावधी साठी कमी करणे,कर्तव्यावर असताना कागदी रोल योग्य प्रमाणात न देतां स्वतःचे पैसे खर्च करण्यास भाग पाडणे,चालक वाहक यांच्या विश्राम गृह सह शौचालयाची दुरावस्था असून जाणूनबुजन दुर्लक्ष करणे, कर्मचाऱ्यांत भेदाभेद निर्माण करणे, यासह अनेक समस्यांचा पाढा कर्मचाऱ्यांनी वाचला. कर्मचारी जाब विचारण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालयात गेले असता सदर घटनेचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकारालाही आगार प्रमुख इम्रान पठाण यांनी अरेरावी करीत वृत्तांकन करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्न केला व शिपायाला बोलवून पत्रकारांना कार्यालय बाहेर काढण्यास सांगितले. अश्या उर्मट अधिकाऱ्यावर सरकारने कडक कारवाई करावी व कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य केलेल्या कारवाई मागे घ्यावे,अशी मागणी होत आहे.
आंदोलनाची घटना कळताच आमदार अनिल पाटील आंदोलनस्थळी येवून कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून योग्य कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन उग्र होण्याच्या आत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पीएसआय नरसिंह वाघ,पीएसआय अक्षदा इंगळे, पोना सिद्धांत शिसोदे,पोना रवींद्र पाटील, पोना दिपक माळी, पोना बापू साळुंखे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचारी व आगार प्रमुख यांच्यात संवाद साधून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यास सांगितल्याने बस सेवा पूर्वरत सुरू करण्यात यश मिळवले. पत्रकारांशी अरेरावी करून अपमानित केल्याचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला.तर या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहे.
ग्रामीण भागात नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून अनेक बसची पत्रे बाहेर निघाली असून अरुंद रस्त्यांवर समोरून किंवा मागून वाहनचालकाला पत्रामुळे गंभीर इजा होवू शकते. अश्या अनेक नादुरुस्त बसेस अमळनेर डेपोत असुन त्यामुळे प्रवाशांसह चालकाचा जीव ही धोक्यात आहे. अमळनेर आगारात एकही बस आरटीओच्या नियमात बसत नाही तरी चालवण्याचा अट्टाहास केला जात असल्याचां गौप्यस्फोट एका कर्मचाऱ्याने यावेळी केला.