ढेकु सीम येथे शेतकऱ्यांना कीड व रोगांवरील उपाय योजनांची दिली माहिती…
अमळनेर:- तालुक्यातील ढेकु सीम येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या केंद्रिय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिकच्या वतीने खरीप हंगाम २०२३-२४ साठी किरण पाटील यांच्या शेतामध्ये दिनांक ३१ ऑगस्ट व ०१ सप्टेंबर दरम्यान दोन दिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे सहायक संचालक डॉ. अतुल ठाकरे यांनी कपाशी व मका पिकावरील महत्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करून प्रतिपादन केले की, रासायनिक कीटक नाशकांच्या अशास्त्रीय व वारेमाप वापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चातही खुप वाढ झालेली आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकत्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मशागती, यांत्रिक, जैविक व रासायनिक या सर्व पध्दतींचा एकत्रित वापर केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होते. त्याचबरोबर फक्त रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्येही बचत होते. माजी सरपंच जाधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर व विशाल काशिद, कृषी विज्ञान केंद्र मुंब्राबाद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ हेमंत बहेती, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, कृषी पर्यवेक्षक अमोल कोठवडे व अविनाश खैरनार तसेच कृषी सहाय्यक नलिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेस विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये शास्त्रज्ञ डॉ.हेमंत बहेती यांनी महत्वाच्या पीकांवरील कीड व रोगांचे व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. ऋषिकेश मानकर यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली.विशाल काशिद यांनी विविध प्रकारच्या कीटक सापळ्यांची माहिती दिली. कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे सापळे, जैविक कीटकनाशके व फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षासाधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यासही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे अधिकारी यांनी प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्यांना कीड व रोगांचे निरीक्षण करून करावयाच्या उपाय योजनांची माहिती करून दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ढेकू सीम शिवारातील शेतकरीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.