अतिक्रमण आणि पार्किंग वाहनांमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात…
अमळनेर:- शहरात बिल्डरांनी उभारलेल्या व्यापारी संकुलात पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने रस्त्यावरच वाहनांची पार्किंग होत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात हातगाडीवाले व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच शिल्लक नाही. तर यामुळे वाद होऊन पादचाऱ्यांनाच काही हातगाडी व्यावसायिक दादागिरी करून दम भरतात. यामुळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
अमळनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता व्यावसायिक व्यापारी संकुल उभारताना पार्किंगचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी या व्यापारी संकुलात व्यापाऱ्यांनी कोट्यावधी रुपये मोजून दुकाने विकत घेतली आहेत तर रोज ते लाखो रुपयांचा व्यवसाय करतात. परंतु या दुकानासाठी पार्किंगची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांच्या, दुकानदारांची वाहने दुकानांसमोर दोन्ही बाजूंनी पार्किंग केले जातात. त्यामुळे रस्ता रुंद होत आहे. त्यातही चारचाकी वाहन आले तर हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. पादचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. याकडे पालिकाही लक्ष देत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न जटिल होत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागा बरोबरच तहसील कार्यालय आणि पोलिस लाईनला ही विविध हातगाडी,टपरी व्यावसायिकांनी विळखा घातला आहे. त्यामुळे येथून मार्ग काढणे कठीण असते. तसेच पायी जाणार्याचा धक्का लागला तर हे हातगाडी,टपरी व्यावसायिक दादागिरी करतात. त्यामुळे वाद होतात. खरे तर नगरपालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, अतिक्रमण विभाग काय करतो, त्यांना हे रस्त्यावरील अतिक्रमणे दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुकानांच्या दोन्ही बाजूंनी वाहनाची पार्किंग करून रस्ता अरुंद होण्यापासून रोखण्यासाठी मध्ये पाईप किंवा बॅरीकेट लावणे गरजेचे आहे. यामुळे वाहने आत येणार नाही, रस्ता अरुंद होणार नाही आणि पादचाऱ्यांना चालणे सोयीचे होईल, हे नगरपालिका आणि पोलिसानी संयुक्त पणे मोहीम राबवून समस्या सोडवणे आवश्यक आहे. नगरपालिकेने मध्यवर्ती भागात, बाजारपेठ परिसरात सार्वजनिक पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून बाजार करायला येणाऱ्या नागरिकांना इतरत्र वाहने लावता येणार नाहीत.