
पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगाम गेला पूर्णपणे वाया…
अमळनेर:- ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस पडेल असा हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता, मात्र अमळनेर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त १५ टक्के पाऊस पडल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याची परिस्थिती आहे.

अमळनेर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी १६२ मिमी पाऊस होत असतो. यंदा मात्र पूर्ण महिन्याभरात फक्त २५ मिमी पाऊस झाला असून जून आणि जुलै महिन्यात ही दमदार पाऊस न झाल्याने पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. पूर्ण पावसाळ्यात तालुक्यात आतापर्यंत २६४ मिमी पाऊस पडला असून मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या कृपेने सिंचनाच्या सोई तालुक्यात नसल्याने बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर आहे. व या कोरडवाहू शेतीतील जवळपास ९० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली असून थोडेफार उत्पन्न येईल याची आशा आता शेतकऱ्यांना उरलेली नाही. पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेला खर्च पूर्णपणे पाण्यात गेला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून तात्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, कृत्रिम पाऊस पाडून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी किसान काँग्रेस व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे केली असली तरी लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरपणे दखल घेवून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीने भरीव उपाययोजना करणे अपेक्षित आहे.




