शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा, दिल्या विविध सूचना…
अमळनेर:- आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी दिलेली मानवंदना कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख उल्लेखनीय आहे. “एनडीए” मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे मत माजी खासदार तथा निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे भेटी प्रसंगी ते बोलत होते.
राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे सचिव विश्वनाथ माळी, नवलभाऊ प्रतिष्ठान या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, पंडितराव सपकाळ (बुलढाणा), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रा के वाय देवरे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राजेंद्र निकुंभ, प्राचार्य पी एम कोळी, प्रभारी कमांडन्ट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर एस एन पाटील, नायब सुभेदार बी पी पाटील, हवालदार धनराज पाटील यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समिती सदस्य विश्वनाथ माळी यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. श्री माळी यांनी सांगितले की, सैनिकी शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी “एनडीए” मध्ये दाखल होण्यासाठी गणित, इंग्रजी, विज्ञान शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी “एनडीए” परीक्षेची चांगली पूर्वतयारी करून घेतली तर निश्चितच त्याचा फायदा होईल. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्या सह महाराणी ताराराणी यांच्या विषयी माहिती दिली. त्यांनी शिक्षकांना “एसएसबी” विषयी माहिती दिली. सावंत यांनी इंग्रजी शिक्षक उमेश काटे, शरद पाटील, अनिल पाटील, एस बी पवार, एस एन नगराळे या इंग्रजी शिक्षकांनी केलेल्या अध्यापन कार्याची प्रशंसा केली. सैनिकी शाळांकरिता सुधारित धोरणांचा मसुदा तयार करण्याकरिता नागराज पाटील, उमेश काटे, ए.ए. वानखेडे, शरद पाटील, व्ही.डी.पाटील, एस.एन.महाले या शिक्षकांनी लेखी सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे आलेल्या मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर सैनिकी शाळेत देण्यात येणारे विविध प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करून दाखवली. यावेळी समितीने शालेय परिसर, होस्टेल, मेस यासह शालेय इमारतीतील सुसज्ज संगणक कक्ष, विविध प्रयोगशाळा, इंग्रजी भाषा लॅब तसेच विविध वर्ग खोल्यांची पाहणी केली. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करून सैनिकी शाळांकरिता सुधारित धोरणांचा मसुदा तयार करण्याकरिता राज्यस्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक (पुणे) हे या समितीचे अध्यक्ष असून या समितीत राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे सचिव विश्वनाथ माळी यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक, सातारा सैनिकी शाळेचे प्राचार्य, आर्मी वेल्फेअर सोसायटी अथवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खडकवासल्याचे प्रतिनिधी हे समिती सदस्य असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव राहणार आहेत.