
भाविकांनी दर्शनाचा लाभ आयोजकांनी केले आवाहन…
अमळनेर:- येथील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला आज दि 16 रोजी प. पू. गोरक्षनाथ जयंती व चैतन्य नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर चोपडा रोडवरील गायत्री शक्तिपीठामागे असलेल्या ह्या नाथपंथीय समाधी मंदिराचे साधारणत: १३ व्या शतकातील बांधकाम पूर्णत: दगडात असून मंदिरांत जाण्यासाठी २ बाय ३ फुटांचे दगडी प्रवेश द्वार आहे. प्रवेश द्वारांतून आत गेल्यावर जवळ जवळ ५ बाय ५ फुटांचा चौथऱ्यावर नाथपंथीय सिद्धांच्या दोन शिवलिंगाकार संजीवन समाध्या आहेत. तत्कालीन अल्लाऊदीन बादशाहाने नाथपंथीय तोरणमाळ मठाला जी सनद करून दिली आहे, त्यांत ह्या स्थानाचा उल्लेख असून साधकांला येथे नाथ चैतन्यांची अनुभूती येत असते. या प्राचीन नाथ स्थानावर योगी गोरक्ष नाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक तापाने पोळलेल्या मानवांचे दुःख व संकटांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करणाऱ्या अशा ज्ञात अज्ञात नाथपंथीय योग्यांच्या असंख्य समाध्या-स्मृती स्थळे आसेतू हिमाचल पसरलेल्या असून त्याद्वारे जीव-ब्रह्म सेवेचे कार्य अखंडीत पणे होत आहे. गेली ४० वर्ष नवनाथ भक्त मंडळातर्फे या स्थानावर नवनाथ चैतन्य महापूजेचे व पूज्य गोरक्षनाथ जयंतीचे आयोजन केले जात असून गोरक्षनाथ जयंती निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवनाथ भक्त मंडळ, अमळनेर यांनी केले आहे.







