चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, रात्रीची गस्त घालण्याची मागणी…
संदीप लोहार
पातोंडा, ता. अमळनेर:- येथे १८ रोजी रात्री १:४५ वाजेच्या सुमारास चोरट्यानी बस स्टॉप परिसरात दोन पान टपरी व एक जनरल किराणा दुकान फोडून रक्कम लंपास केली. सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज मध्ये चोरी करतांना दिसत आहे.
बस स्टॉप परिसरात रघुनाथ रोकडे यांचे जनरल किराणा व थंड पेय दुकान घराच्या बाहेर आहे. रात्री १:४५ वाजेच्या सुमारास रोकडे कुटुंब घरात झोपले असल्यावर सीसीटीव्ही पहिल्या फुटेज नुसार अगोदर पिवळा टी-शर्ट व काळी जीन्स घातलेला इसम तोंडावर हात लावून आलेला दिसतो. तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तोच इसम दुकानाचे कुलूप तोडून हातात बॅटरी व टिकाव घेऊन खुर्चीवर चढत कॅमेऱ्याची दिक्षा बदलवून वरती करतांना दिसत आहे. या वेळी त्याने अंगातील पिवळ्या कलरचा टी-शर्ट कमरेला बांधून डोक्यावर काळा कापड टाकलेला दिसत आहे. यावेळी चोरट्यानी दुकानाची झाडाझडती घेत गल्यातील ७००-८०० रुपयाची चिल्लर व भारत गॅस कंपनीचे भरलेले सिलेंडर व किरकोळ सामान चोरट्याने चोरून नेल्याचे दुकान मालक रघुनाथ रोकडे यांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत चोरट्यानी समाधान रोकडे यांची बस थांबा जवळ नास्ता व पान टपरी आहे. टपरी फोडून ३००० ते ४००० हजार रोख रक्कम व किरकोळ सामान चोरीला गेला असल्याचे समाधान रोकडे यांनी सांगितले. तर तिसरी घटना या टपरी समोरच प्रकाश कोळी यांची पान टपरी आहे. या टपरीचे ही कडी कोंडा तोडून सलाखी वाकवलेली दिसत आहे. या टपरी मधून काही चोरी न झाल्याचे प्रकाश कोळी यांनी सांगितले.
परिसरात व गावात चोरीच्या घटना कायम होतच असतात. पोलिसांनी निदान रात्रीच्या वेळी तरी परिसरात गस्त घालावी. जेणे करून चोरट्यावर वचक राहील, अशी मागणी ग्रामस्थ व व्यावसायिक करीत आहेत.