महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत झाला निर्णय, ७२ वर्षांनी अमळनेरला दुसऱ्यांदा मान…
अमळनेर:- साहित्यिक व साहित्य रसिकांना आनंदाची बाब म्हणजे आगामी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मातृहृदयी साहित्यिक पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर नगरीत भरविले जाणार असल्याचा निर्णय काल पुणे येथे झालेल्या बैठकीत निवड समितीने घेतला आहे.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे गठित करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीतर्फे सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश बंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक सहभागी झाले होते. या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा येथील संस्थेचे दृक्-श्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची निवड केली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यां व्यतिरिक्त प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते. या आधी १९५२ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. आता ७२ वर्षांनी पुन्हा अमळनेरला मान मिळाला आहे. तर १९८४ ला ५७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे झाले होते साहित्य संमेलनाच्या ९६ वर्षात जळगाव आणि अमळनेर नगरीत एकदा साहित्य संमेलन भरवले होते. अमळनेरला हा मान बहुमान दुसऱ्यांदा मिळतो आहे.