शेतकरी हिताची जाण असणाऱ्यांनाच निवडून आणण्याची बळीराजाची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस फक्त दोन दिवस बाकी असून मतदारांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन होणार आहे. त्यामुळे पाकीटांच्या वजनावर उमेदवार निवडून येणार की शेतकरी हिताची जाण असणारे उमेदवार निवडून येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीत तीन पॅनल व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनलकडे बरेच उमेदवार मात्तबर व आर्थिक दृष्ट्या सक्षम असून भाजपा व शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलने त्या तुलनेत काही नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे. गावरान जागल्या संघटना व आम आदमी पार्टी पुरस्कृत शेतकरी शोषण मुक्ती पॅनलही मैदानात उतरले असून त्यांच्याकडून नुसत्या भेटीगाठी व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील बाजार समिती निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली होती. दोन्ही गट तसेच ठराविक अपक्ष उमेदवारांनी मतदारांना लक्ष्मी दर्शन घडविले घडविल्याने त्यामुळे यंदा ही मतदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. मात्र पाकिटे घेवून हि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यापैकी काही उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत लढा देत निवेदन देत प्रसंगी आंदोलन करत बरेच प्रश्न सोडविले आहेत. अश्या ठराविक उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मागील वेळी निवडून आलेले काही उमेदवार यंदा ही पाटी लावण्यास सज्ज असून मात्र मागील कार्यकाळात यांनी बाजार समितीत काय दिवे लावले आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वेळी अपक्ष लढून जिंकून गेलेल्या काही उमेदवारांना यंदा ही अपक्ष लढून एकच मत द्या अशी याचना करत निवडून येवू असा फोल आत्मविश्वास आहे. मात्र यंदा मतदार राजा त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यापैकी काही उमेदवार प्रत्येक संस्थेत पाटी लावण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून खाशि, अर्बन, मार्केट सगळीकडे आपलीच पाटी असावी असा त्यांचा हेका असून त्यांना शेतकरी हिताची किती जान आहे ते त्यांनाच ठाऊक. बरेचशे उमेदवार त्या तुलनेत नवखे असले तरी वैयक्तिक हित संबंध आणि आर्थिक उलाढाल यावरच सर्व गणित अवलंबून असणार आहे. मात्र शेतकरी हिताचे कार्य करणारे व प्रश्नांची सोडवणूक करत प्रसंगी लढा देणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य मिळावे अशी मागणी होत आहे.