
निकृष्ट गटारी व नागरी सुविधा पाहून घ्या म्हणून आग्रह मात्र, धरण पाहून येतो म्हणून सांगत काढला पळ..
अमळनेर:- तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या पाडळसरे धरणामुळे पुनर्वसन झालेल्या पाडळसरे नवीन गावातील निकृष्ट गटारीतुन पाण्याचा निचरा होत नसल्याने गावकऱ्यांना आरोग्याचा प्रश्न सतत भेडसावत असल्याने व इतर नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने ग्रामपंचायत कडून कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांना भेटून व लेखी पत्र देऊनही फक्त चाल ढकल करून वेळ मारून नेतात म्हणून परत स्मरणपत्र देऊनही गटारीतून पाण्याचा निचरा आजतागायत झालेला नाही, शेतीपोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईन, गावठाण जमिनीचा हक्क आदी समस्या लेखी कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने काल पाडळसरे धरणस्थळी कामाची पाहणी करण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्र गो मांदाळे हे अभियंत्यांच्या ताफ्यासह धरणाकडे जाणार म्हणून माहिती गावकऱ्यांना लागली आणि सरपंच पती सचिन पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी मिळून कार्यकारी संचालक यांची गाडी अडवून कार्यकारी संचालक गाडीतून उतरवले.

गावकरी आणि सचिन पाटील यांनी कार्यकारी अभियंता आमच्या पत्राची दखल घेत नाहीत साहेब आपणच प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या गटारी पाहून घ्या, गटारी निर्माण झाल्यापासून आजतागायत पाण्याचा निचरा झाला नाही , रोगराईने गावकऱ्यांना त्रासून सोडले आहे. डासांची उत्पत्ती दिवसाही घरात गल्लीत थांबू देत नाहीत म्हणून गाऱ्हाणी मांडल्या मात्र संतप्त गावकऱ्यांना गोड बोलून धरण पाहून आलो मग जाताना पाहतो म्हणून सांगत वेळ मारून नेली मात्र तासभर सचिन पाटील व गावकरी थांबून होते. परत जातांना कार्यकारी संचालक प्र गो मांदाळे हे न थांबता भरधाव वेगाने वाहनांचा ताफा घेऊन पळ काढला. यामुळे गावकरी मात्र अधिक संतप्त झाले असून कार्यकारी संचालक, कार्यकारी अभियंता यांना फक्त धरण हवं मात्र धरणासाठी त्याग करून समस्या भोगणाऱ्या पुनर्वसित प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ काढला नाही म्हणून पुन्हा गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील असे सचिन पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक प्र गो मांदाळे याच्या सोबत पाडळसरे धरणाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, उपविभागीय अभियंता हितेंद्र भटुरकर, सहाय्यक अभियंता मनोज पगारे, शुभम मुदीराज, शाखा अभियंता ऋतूत सोनवणे आदी उपस्थित होते.







