आंदोलनाच्या समर्थनार्थ चोपडा ते अमळनेर काढली बाईक रॅली…
अमळनेर:- जातप्रमाणपत्र मिळावे म्हणून टोकरेकोळी समाज बांधवांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरूच असून आंदोलनाच्या समर्थनार्थ काल चोपडा ते अमळनेर बाईक रॅली काढण्यात आली.
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा सन २००९ पासून अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव करण्यात आलेला आहे. कारण ह्या मतदारसंघात आदिवासीबहुल लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या व मतदारसंख्या एकट्या कोळी जमातीची आहे. परंतु अजूनही येथील आदिवासी कोळी जमातीला टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनदरबारी भटकंती करावी लागत आहे. आधीच राष्ट्रपतींचा अध्यादेश कलम ३४२ अन्वये शेड्युल ट्राईब्ज मोडीफिकेशन लिस्ट १९५६ नुसार अनु. जमातीमध्ये जमात नेमुन दिलेली आहे. तसेच ना. उच्च न्यायालयाने सुध्दा प्रथम दर्शनी पुरावा पाहुन तात्काळ अनु.जमातीचे जातप्रमाणपत्र देण्याचा आदेश दिलेला आहे. तरिही संबंधित विभागातर्फे समाजावर हेतुपुरस्सर अन्याय केला जात आहे. म्हणुनच चोपडा तालुका आदिवासी टोकरेकोळी जमातीतर्फे दि. ८ मे पासुन ते मागण्या मान्य होईपर्यंत अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. अमळनेर येथे अन्नत्याग सत्याग्रहाला समर्थन म्हणून मोठ्या संख्येने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. बाईक रॅलीत चोपडा व अमळनेर तालुक्यातील खेड्यापाड्यातील बांधवानी सहभाग दिला. आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या संविधानिक हक्क मागणी संदर्भात दि. 8 मे 2023 पासून प्रांत कार्यालय अमळनेर समोर अन्नत्याग सत्याग्रहाचा नारा श्री.जगन्नाथ बापू बाविस्कर यांच्या तर्फे पुकारण्यात आला आहे. त्या उपोषणाला समर्थन म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक व युवा संघटक शुभम सोनवणे, ॲड. गणेश सोनवणे व समाजाचे सर्व समाज बांधव यांच्या वतीने प्रांत कार्यालयाला कायदेशीर बाजू मांडण्याकरिता निवेदन अर्ज टपाल विभागात दाखल करण्यात आला. तसेच सदर निवेदन अर्जाच्या प्रति विभागीय आयुक्त, नाशिक, राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाला प्रती दाखल करणार असल्याचे कळविले. आद्यकवी महर्षी वाल्मिकींचा व भारतीय संविधानाचा जयघोष करत रॅली अमळनेर शहरात उपोषण स्थळी पोहोचली.