७०० लिटर रसायन केले नष्ट, आरोपीस घेतले ताब्यात…
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर मारवड पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर रसायन नष्ट करत आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जैतपीर येथे विकी संतोष कोळी हा गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी जैतपीर येथे नाल्याकाठी शेतात छापा टाकला असता आरोपीस रंगेहाथ पकडले. त्याठिकाणी ६५० लिटर कच्चे रसायन, ५० लिटर पक्के रसायन, ३० लिटर तयार दारू असा २२,२०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. मारवड पोलीसात पो.ना. धनंजय देसले यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार किशोर पाटील करीत आहेत.