अमळनेर:- शहरातील ३३ वर्षीय विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.12 रोजी घडली आहे.
शहरातील तांबेपुरा भागातील रुपाली गजेंद्रसिंग राजपूत ह्या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. दि ११ रोजी सायंकाळी रेल्वेने परत आल्यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या, यामुळे पतीने तांबेपुरा येथील एका खाजगी डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. थोडावेळ बरेही वाटले मात्र सकाळी पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने सकाळी १०:३० वाजता तात्काळ रिक्षा करून एका खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात येवून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर महिलेच्या पश्चात पती, सासू, सासरे,दिर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत्या.
दरम्यान मे हिटचा चांगलाच तडाखा बसत असून तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी कामे शक्यतो टाळावीत असे आवाहन करण्यात येत आहे.