उपसभापतीपदी सुरेश पिरण पाटील यांची वर्णी, प्रत्येक वर्षी नवीन सभापती व उपसभापतीचा फॉर्म्युला…
अमळनेर:- बहुचर्चित अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर अशोक आधार पाटील यांची निवड करण्यात आली असून उपसभापती पदावर काँग्रेसचे सुरेश पाटील यांची वर्णी लागली आहे. या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर सभापती निवडीच्या सहा दिवस आधी ११ संचालक मुंबई येथे नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी रवाना झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल धुळे येथे मुक्काम करून आज सकाळी दहा वाजता या संचालकांचे आमदार कार्यालयात आगमन झाले. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्यासोबत बैठक होवून अशोक पाटील यांचे नाव फायनल करण्यात आले. दरवर्षी नवीन संचालकांना सभापती व उपसभापती पदी संधी दिली जाणार असल्याचा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याची माहिती आहे. तालुक्यातील लोण येथील रहिवासी अशोक आधार पाटील यांचे नाव निवडून आल्यापासून चर्चेत होते. तसेच समर्थकांनी त्यांच्या नावाचा रेटा लावला होता. त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडल्याने समर्थकांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. सभापतीपदासाठी सर्वच मातब्बर नावे पुढे होती. मात्र अशोक पाटील यांनी प्रथम मान मिळवला आहे. अशोक पाटील हे लोण येथील रहिवासी असून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गेल्या काही वर्षात पुढे आले आहे. तसेच त्यांनी बाजार समितीसोबत जिल्हा परिषदेची तयारी ही सुरू केली होती. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीपुढे आता बाजार समितीचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे.