सकाळी पत्नीशी व्हिडिओ कॉलवर झाले बोलणे, दुपारी मृत्यूचे वृत्त धडकले…
अमळनेर:- तालुक्यातील लोणखुर्द येथील रहिवासी व भारतीय सीमा सुरक्षा बलाच्या सेवेत अरुणाचल प्रदेशातील भूतान सीमेवर सेवारत असलेल्या जवानाचा वाहनाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक १६ रोजी दुपारी घडली असून लिलाधर नाना पाटील (वय ४२) असे मृत सैनिकाचे नाव असून त्यांच्यावर लोणखुर्द येथे दिनांक १९ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या जवानांना खाद्यपदार्थ पोहचविण्यासाठी जात असलेल्या आर्मीच्या गाडीचा अपघात झाला. त्यात मागचे फाटक तुटल्याने तालुक्यातील लोणखुर्द येथील भारतीय सुरक्षा बलात हवालदार पदी असलेल्या सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. लोण येथील लीलाधर नाना पाटील ह्या शेतकरी कुटुंबातील युवकाला देशप्रेम व देशसेवा करण्याची आवड शालेय जीवनापासून होती. व्यायाम व अभ्यास करून तो २००१ साली भरती झाला सन २०१९ मध्ये बाँड संपल्यावर त्यांनी दोन वर्ष सेवाकाळ वाढविला. परत २०२१ मध्ये चार वर्ष सेवा काळ वाढवून घेतला. आता ते आसाम मधील गुवाहाटी येथे सैन्यदलात कार्यरत होते. गेल्या २ जानेवारी रोजी ते सुटी संपल्याने सेवेसाठी पुन्हा कार्यरत झाले होते. आसामहून ४०० किमीवर अरुणाचल प्रदेशात भूतान सीमेवर त्यांची बदली झाल्याने आर्मीच्या ट्रक मध्ये २० जणांची तुकडी व खाद्यपदार्थ नेली जात होती. लीलाधर हे मागे बसलेले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचा अपघात झाल्याने मागचे फाटक तुटल्याने लीलाधर शिंदे खाली पडून दगडाचा मार लागल्याने जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी सोनाली, इयत्ता नववीत शिकणारा मुलगा सुयश (वय १५) इयत्ता ६ वीत शिकत असलेली मुलगी मीनाक्षी (वय १२), मोठा भाऊ रवींद्र व लहान भाऊ शैलेंश असा परिवार आहे. ते वायरमन प्रवीण पाटील यांचे मेव्हणे होत.
सकाळी व्हिडीओ कॉलवर झाले बोलणे आणि दुपारी निधनाचे वृत धडकले…
काल सकाळी ९:३० वाजता मृत लीलाधर शिंदे यांनी पत्नी सोनाली हिस व्हिडीओ कॉल केला होता. त्यात मुलांच्या शिक्षणाविषयी बोलणे झाले. पप्पा कधी येणार म्हणून मुलगी मोनाक्षीने लीलाधर शिंदे यांना विचारले असता बेटा आता ३ मे ला सुटी मिळणार होती पण उन्हाळा असल्याने पावसाळा सुरू झाल्यावर येईल म्हणून आश्वासन दिले. टाटा बाय बाय केले आणि मी आता ड्युटीवरून आल्यावर रात्री बोलेन म्हणून सांगितले मुलांची काळजी घे म्हणून सोनालीला सांगून फोन ठेवला व दुपारी जवान लीलाधर शिंदे यांचा अपघातात निधन झाल्याचे वृत्त धडकताच कटुंबिय व परिवार सुन्न झाला. गावात सायंकाळपर्यत जवान लीलाधर शिंदे अमर रहेचे फलक लागले आणि गावात स्मशान शांतता पसरली. गावात चुलही पेटली नाही, मृत लीलाधर शिंदे यांचे प्रेत १८ रोजी रात्री उशिरा गावी पोहचणार असून दिनांक १९ रोजी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिली आहे.