पुरोगामी विचारांनी समाजात ठेवला नवा आदर्श, तीन मुलांचा झाला बाप…
अमळनेर:- पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून तिच्या जीवनाला आधार देत तीन मुलांचा बाप झाला असून नवदांपत्य राहुल विनोद काटे (वय-३१) व अनिता काटे (वय-२८) यांच्या विवाहाने मराठा समाजात एक आदर्श ठेवला आहे.
पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील विनोद आसाराम काटे यांच्या कुटुंबात क्रूर नियतीने गेल्या चार वर्षात तीन पिढ्यांतील चक्क चार सदस्य कुटुंबापासून हिरावून नेले आहेत. गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला बत्तीस वर्षीय युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्यावेळी संभाजी यांचे निधन झाले त्यावेळी पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या विद्या व वैभवी या जुळ्या मुली होत्या. अशा वेळी सासरच्या मंडळींनी धिर देत अनिता यांनी “मयंक” या गोंडस बाळाला जन्म दिला. भावाच्या निधनानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने विधवा वहिनी, जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्या “मयंक” डोळ्यासमोर होते. त्यांचं दुःख पहावत नसलेल्या दिराने विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार देण्यासाठी तयार झाला. प्रतिकूल परिस्थितीत आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात नेहमीच सुन म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकु हसत खेळत असावं असा निर्णय कुटुंबियांनी घेतला. आपल्या विधवा वहिनीवर कठीण प्रसंग येऊ नये, जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्याला वडिलांचे प्रेम कमी पडू नये म्हणून एका मोठ्या मनाच्या तरुणाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. आपली स्वतःची भावी स्वप्ने बाजूला सारत राहुल काटे याने आपली विधवा वहिनी अनिता हिच्याशी कोळपिंप्री येथील भवानी मंदिर परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह केला. त्यांच्या या विवाहाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
कोळपिंप्री गावाला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. पूर्वीपासून सत्यशोधक समाजांच्या विचारांनी घडलेले हे गाव आहे. याच पार्श्वभूमीवर राहुलने घेतलेला निर्णय अतिशय अभिमानास्पद असून मराठा समाजामध्ये अशा निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून ती काळाची गरज आहे. यावेळी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे व सचिव उमेश काटे यांनी नववधू अनिता काटे व वर राहुल काटे अभिनंदन केले आहे.