
जिल्हा बँकेकडून पीककर्जदार शेतकऱ्यांची लूट थांबवा…
जळगाव जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- कापूसाचा दर हा हमीभावापेक्षा खाली आल्याने सरकारी खरेदी सुरू करावी तसेच जिल्हा बँकेकडून पीककर्जदार शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी अशी मागणी करत जळगाव जिल्हा काँग्रेसने निवेदन दिले आहे.

सरकारी अनास्था व सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून कापसाचा भाव दररोज कमी होताना दिसत आहे. काही ठिकाणी व्यापारी ७००० रू. प्रति क्विंटल भावाने कापूस खरेदी करत आहेत. सरकारी भाव ८२०० रू. असून त्यामुळे १२०० रुपयाने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अन्यथा ५० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बँक ही प्रत्यक्ष रित्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता विकासोच्या माध्यमातून कर्ज वाटप करत असते. मात्र मागील वर्षी जिल्हा बँकेने प्रोसेसिंग फिच्या नावाखाली २३३ रुपये परस्पर कपात केली. तसेच यंदा ही १५० रुपये सिविल स्कोरच्या नावाने परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यातून कपात केली जात आहे. त्यामुळे जवळपास ५० कोटीत ही रक्कम जमा होणार असून ही शेतकऱ्यांची एकप्रकारे लुटच आहे. त्यामुळे ही लूट तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेसने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, किसान काँग्रेसचे प्रा. सुभाष पाटील, बाळू नत्थु पाटील, नीलकंठ सोनू पाटील, विजय काशिनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








