
अमळनेर:- राज्यातील महिलांकरिता विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या समस्यांचे व अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कार्यक्रम राबविण्याबाबत मंत्री महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडून सूचनेनुसार महिला व बाल विकास विभाग तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी, तहसीलदार, महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन तालुका पातळीवर करण्यांत आले आहे.

अमळनेर येथे दिनांक २२ मे २०२३ रोजी गंगाराम सखाराम हायस्कूल येथे सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत करण्यांत आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना व्यासपीठ मिळावे, शासकिय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचावा, तसेच त्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण होऊन महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात सदर तालुक्यातील महिलांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे व या शिबीराचा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील यांनी केले आहे.








