गावात शिवारफेऱ्या सुरू, पावसाळ्यानंतर होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात…
अमळनेर:- राज्य शासनाने राज्यात जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्याचा निर्णय घेतला असून अमळनेर तालुक्यातील पंधरा गावांची यात निवड करण्यात आली आहे.
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवाय अभियान २ ही योजना काही बदल करून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात अवर्षण प्रवण गावांची निवड करण्यात आली असून पाण्याचा अतिवापर झालेल्या व अवर्षणग्रस्त भागात भूजलपातळी वाढवणे व पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करणे हे या योजनेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गावांमध्ये शिवारफेरी करायची असून शिवारफेरी पूर्ण झाल्यानंतर गाव आराखडा तयार करणे, गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करून त्याला ग्रामसभेची मान्यता घेणे. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर तालुकास्तरीय समितीने गाव आराखड्यांना मान्यता देऊन ते प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवायचे आहे. जिल्हा समितीने या आराखड्यांना मान्यता दिल्यानंतर जलसंधारण विभागाने सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून निधीची मागणी करत तांत्रिक मान्यता द्यायच्या आहेत. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करायचे असून कामाच्या निविदा प्रसिद्ध करायच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत व कृषी विभागाचे साहाय्य घेवून ही योजना राबविली जाणार आहे. सध्या निवड झालेल्या गावात शिवार फेरी सुरू असून पावसाळयात सर्व कागदोपत्री कार्यवाही करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे.
अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक, खोकरपाट, लडगाव, बोदर्डे, अमळनेर (ग्रामीण), कामतवाडी बुद्रूक, देवगाव, ढेकु खुर्द, धुपी, एकरुखी, कुऱ्हे खुर्द, कुऱ्हेसीम, मांजर्डी, पिळोदे, व्यवव्हरदळे या पंधरा गावांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया:-
सध्या निवड झालेल्या गावात शिवार फेरी प्रक्रिया सुरू असुन आराखड्यात काही खोलीकरण, शेततळे, कंपार्टमेंट बंडींगच्या कामाचा समावेश करावयाच्या असल्यास सदर गावातील ग्रामस्थांनी शिवार फेरी दरम्यान गाव आराखड्यात या कामाचा समावेश करण्याबाबत सुचवावे.
:- भरत वारे, तालुका कृषी अधिकारी