
बांधकाम ठेकेदारावर चाकूने वार करत अडीच लाखांची लूट…
अमळनेर:- अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराकडून भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांची लुट केल्याची खळबळजनक घटना काल दुपारी धरणगावपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर म्हसले गावाजवळ घडली.

शहरातील ताडेपुरा भागातील बांधकाम व्यावसायिक व सध्या जळगाव येथे राहत असलेले बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी ( वय ३५) हे जळगाव येथून अमळनेर कडे येण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत एका व्यवहारासाठी नेत असलेली अडीच लाखांची रोकड होती. धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने वार केले आणि त्यांच्याकडील अडीच लाख रुपये व दुचाकी हिसकावून चोरटे अमळनेरच्या दिशेने पसार झाले. त्यांना प्रवाशांच्या मदतीने धरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन तेथे उपचार सुरू आहेत. याबाबत धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत दवाखान्यात भेट देत विचारपूस केली असून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दुपारी रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या लुटीमुळे मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे.








