बसस्टँडसमोर सापडलेले पैसे पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाला केले परत…
अमळनेर:- शहरातील बस स्थानकासमोरून कामाला जात असताना ललिता सोनार यांना ५०० च्या नऊ नोटा सापडतात, आई दवाखान्यात उपचार घेतेय, पैश्यांची नितांत गरज आहे, अशी परिस्थिती असताना देखील श्रीमती सोनार यांनी पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाला सदरचे पैसे परत करून प्रामाणिकपणाचा दाखला दिला आहे.
दिनांक २५ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अमळनेर शहरातील कुंभार टेक भागातील रहिवाशी ललिता चंद्रशेखर सोनार ह्या आपल्या कामाच्या ठिकाणी कोर्टासमोर श्री गणेश पॅथॉलॉजी लॅब येथे रणरणत्या कडक उन्हात कामास जात असतांना अमळनेर बस स्थानकासमोर त्यांना ५०० रुपयांच्या ९ नोटा पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी आजूबाजूस पाहीले असता त्या ठिकाणी कोणीच न दिसल्याने त्या आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन श्रीगणेश पॅथॉलॉजीचे मालक सुनील पाटील यांना सदर सापडलेल्या पैशांबद्दल सांगीतले सुनील पाटील यांनी लागलीच अमळनेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना फोनवरून सापडलेल्या पैशांबद्दल कळविले व पैसे ज्या कुणाचे असतील त्यास परत करायचे असल्याबद्दल सांगीतले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना मुळ मालकास शोधून काढून त्यास खात्री करून हजर करण्यास सांगितले. विचारपूस केली असता इस्लामपूरा भागातील टॅक्सी चालक कमरोद्दीन शेख अहमद (वय 68) यांचे महत्वाचे काम असल्याने दुसऱ्याकडून हात उसनवारी आणलेले पैसे खिशातून हातरूमाल काढत असतांना कुठे तरी पडले असल्याबाबत कमरोद्दीन यांनी सांगीतले. तेव्हा तुम्ही घाबरु नका तुमचे पैसे ललिता सोनार यांना सापडले असून पैसे तुम्हालाच परत मिळतील असे ऐकल्यावर कमरोद्दीन यांना अश्रू अनावर झाले. रक्कम परत करतेवेळी पोलीस ठाण्यात ललिता सोनार यांना कमरोद्दीन यांनी गहिवरल्या मनाने व थरथरत्या हाताने आशीर्वाद तसेच बक्षीस म्हणून 1 हजार रुपये देऊ केल्यावर ललिता सोनार यांनी बक्षीस घेण्यास देखील प्रामाणिकपणे हात जोडून नकार दिला. ललिता सोनार यांच्या आई आजारी असुन डाॅ. बहुगुणे यांच्या कडे ॲडमिट असुन व पैशांची नितांत गरज असताना त्यांनी प्रामाणिक पणा दाखवला तेव्हा तेथील उपस्थित लोकांनी देखील ललिता सोनार यांचे प्रामाणिकपणाला सलाम असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.