
पालकमंत्र्यांना दिले निवेदन, लवकर पुनर्वसन न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथील अंशतः बाधित असलेल्या 176 कुटुंबीयांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू ठेवला आह. संबंधितांना निवेदन देऊनही अद्याप पुनर्वसन न झाल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवदेन दिले आहे. आमचे पुनर्वसन न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीने (आंबेडकर गट) दिला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोहरे गाव तापी नदी व बोरी नदी संगम तापी नदीपासुन 500 मीटर अंतरावर सखल भागात वसलेले आहे. गावाला लागून तापी नदी पूर्व पश्चिम दिशेने प्रवाहीत होते तर बोरी नदी दक्षिण उत्तर दिनेश प्रवाहीत आहे. गावाच्या समोरुन तापी नदीला अनेर नदी मिळते. तिन्ही नद्यांचा एकत्रित जलसाठा बोहरे गावाजवळ प्रवाहीत होतो. तिन्ही नद्यांना एकाच वेळेस पावसाळयात एखाद्या दिवसानंतर पूर आला तर महापुराचे स्वरुप येते. त्यामुळे काठावर वसलेली 176 कुटूंबियांची वस्तीचा रहिवाशांमध्ये घबराट व भिती निर्माण होते. रात्रंदिवस जागे राहून संकटा परिस्थितीला सामोरे जावे लागते. बिकट परिस्थिती निर्माण होते त्यामुळे जिवीत हानी होण्याची भिती निर्माण होते. त्यासाठी तात्पुरते स्थलांतर करावे लागते. गुरे ढोरे बांधण्यासाठी देखील कुठलेही जागा शिल्लक राहत नाही. तसेच कठीण परिस्थितीत जिव वाचविण्यासाठी कोणतेही साधन राहत नाही. दरवर्षी काठावर वसलेल्या वस्तीतील घरांची पडझड होते. घरांना त्या काळात सतत ओलावा असतो. तसेच रोगराई परिस्थिती निर्माण होते. गायी म्हशी, शेळी, मेंढया यांच्यावर साथीचे रोग येतात तरी याबाबत आम्हास न्यास मिळावा, असे त्यांनी म्हटले आहे. निवेदनावर पार्टीचे शहराध्यक्ष अॅड. अभिजित बिर्हाडे, जिल्हा महासचिव यशवंत बैसाणे, तालुकाध्यक्ष पितांबर वाघ यांच्या सह्या आहेत.
पालकमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी शासनाने पिडीतांना कायम स्वरुपी रहावयास जागा उपलब्ध करुन देणे, पिडीतांना सरकारी नोकरी उपलब्ध करुन द्यावी, पिडीतांना पारिवारीक उदरनिर्वाहासाठी व्यवसाय उपलब्ध करुन देणे, तसेच शासनामार्फत अनुदानित कर्ज उपलब्ध करुन देणे, पिडीतांच्या परिवारातील मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करुन देणे. पिडीतांना पुर्नवसन शासकीय दाखला देणे, ह्या मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत





