पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कठोर कार्यवाहीची केली मागणी…
अमळनेर:- शरयू ट्रस्ट नावाची संस्था “इंडिक टेल्स” ही वेबसाईट चालवत असून ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती- फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा तीव्र निषेध करत संबधितांवर कठोर कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन अ.भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना देण्यात आले.
या वेबसाईटवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन,शिवसेनेचे संघटक साखरलाल महाजन, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील,भास्कर महाजन, डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परीषदेचे सोमचंद संदानशिव,जिल्हा नियोजन समितीचे मा सदस्य पंकज चौधरी, विठ्ठल पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील आदि उपस्थित होते.