अमळनेर येथे मुक्त विद्यापीठाच्या बहीस्थ परीक्षकास पैसे घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले…
अमळनेर:- येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहीस्थ परीक्षकालाच लाच घेतांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. यात विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. परीक्षा काळात परीक्षार्थींना विनाकारण त्रास देणे, कॉपी चालू देण्यासाठी त्यांच्याकडून पैश्यांची मागणी करणे असे प्रकार चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. यातच तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर ८ विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी.लिब) चे पेपर सूरु होते. विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १०० असे ९ विषयांसाठी एकूण ९०० रुपयांची अशी एकूण ७२०० रुपयांची मागणी त्यांनी विद्यार्थ्यांकडे केली. २ जून रोजी पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील यांना तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी ५००० रुपये महाविद्यालयाच्या आवारात देत असतांनाच नाशिक ला.प्र.वि.नाशिक चे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पथकातील राजेंद्र गीते,संदीप बत्तीसे, संजय ठाकरे,संतोष गांगुर्डे यांनी त्यास रंगेहाथ पकडले.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.