मात्र चोरीचा ऐवज तापी नदीत टाकून चोरटा झाला पसार…
अमळनेर:- तालुक्यातील गंगापुरी येथे बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्याने तीन घरांचा मागील दरवाजाच्या कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत लॅपटॉप सह किरकोळ रक्कम चोरून नेली आहे,मात्र चोरलेले लॅपटॉप आणि सोन्याची अंगठी तापी नदीच्या काठावर फेकून दिल्याचे समोर आले. त्यामुळे चोरटे नेमके कशाची चोरी करण्यास आले होते हे समजू शकले नाही.
तालुक्यातील गंगापुरी गावात आतापर्यंत एकदाही चोरीचा प्रकार घडला नव्हता,मात्र बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्याने भीमराव रामोशे, गोरख कुमावत आणि अरुण पवार हे आपापल्या कुटुंबासह घराच्या बाहेर अंगणात झोपलेले असताना घराचा मागील दरवाजाची कडी कोंडा तोडून प्रवेश केला, भीमराव रामोशे यांच्या घरातून किरकोळ रक्कम वगळता चोरट्यांचा हाती काहीच लागले नाही, तर गोरख कुमावत यांच्या घरातून एक हजार सातशे रुपये चोरीस गेले तर अरुण पवार यांच्या घरातून लॅपटॉप आणि सोन्याची अंगठी चोरली मात्र ते देखील चोरट्यांनी तापी नदीच्या खोऱ्यात टाकून दिल्याचे सकाळी गावकऱ्यांच्या निदर्शनास आले, चोरट्यांनी चोरी केली,पण चोरलेला ऐवज फेकून दिल्याने चोरी नेमकी कशासाठी केली हेच समजत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान पातोंडा बिटचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, संदेश पाटील यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. दरम्यान ज्यांच्या घरात चोरी झाली त्यांनी तक्रार न दिल्याने पोलिसात चोरीची नोंद करण्यात आलेली नाही.