अमळनेर:- शहरातील तांबेपुरा भागातील पतीने डांबून ठेवलेल्या महिलेवर उपचार केल्यानंतर ती बरी होवून सुखरूप माहेरी पोहचली आहे.
दिनांक 3 जून रोजी येथील संरक्षण अधिकारी यांना एका महिलेला तिचा पती बेदम मारहाण करत असून तिची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा फोन आला. त्यांनी आधार संस्थेतील रेणू प्रसाद यांच्याशी संपर्क साधला व सोबत ज्ञानेश्वरी पाटील, मोहिनी पाटील यांना घेत तांबेपुरा येथे जावून पीडित महिलेची सुटका केली तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने, नंतर धुळे शासकीय रुग्णालय येथे पाठविले व पोलिसांशी संपर्क करून नवऱ्याविरोधात केस दाखल केली होती धुळे येथील उपचारांवर तिच्या माहेरच्या परिवारातील व्यक्ती समाधानी नसल्याने तिला खाजगी दवाखान्यात उपचार मिळावे ही विनंती केली होती. त्याचवेळी मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी आधार संस्थेच्या भारती पाटील यांच्याशी संपर्क केला आणि महिलेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च व इतर सर्व मदतीची ग्वाही दिली. त्यानंतर सदर महिलेला अमळनेर येथील डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्याकडे हलविण्यात आले. सदर पाच दिवसात महाले यांनी रोज रुग्णालयात भेट देत महिलेची चौकशी केली तसेच तिच्या परिवारातील सदस्यांना आधार दिला. आधार संस्थेच्या रेणूप्रसाद संरक्षण अधिकारी चौधरी,डॉ भारती पाटील यांनी महिलेचे तसेच कुटुंबाचे समुपदेशन केले, काल पाच दिवसांच्या उपचारानंतर ती बरी होऊन तिला आईसोबत झाडी येथे रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान डॉ. सुमित सूर्यवंशी यांनी देखील चांगले सहकार्य केले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी महिलेची उपचारादरम्यान येऊन चौकशी केली. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अशा गंभीर प्रसंगात अनेक वेळी समाजातील हात व दाते पुढे येवून सहकार्य करतात. याकरिता श्रीमती रेणुप्रसाद व भारती पाटील यांनी मंगळग्रह मंडळ मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचे आभार मानले. यानंतर त्या महिलेच्या मुलीच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आम्हीच घेऊ असे महाले यांनी सांगितले.