उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिले आदेश…
अमळनेर:- काल रात्री शहरातील जिनगर गल्ली भागात झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर अमळनेरात संचारबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिले आहेत.
काल शुक्रवार रात्री १० वाजेच्यानंतर जिनगर गल्ली व सराफ बाजार परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. पोलिसांना माहिती मिळताच एपीआय राकेशसिंग परदेशी व पोलिसांचे पथक हजर झाले होते. त्यानंतर वातावरण निवळले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस दंगलीतील संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच याप्रकरणी २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वादाचे कारण अस्पष्ट असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले पोलिसांनी केले आहे. त्यानंतर आज सकाळी अमळनेरात कलम १४४ लागू करत संचारबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिले आहेत. दिनांक १० जून सकाळी ११ वाजेपासून १२ रोजी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचारी, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, दूध वितरण, सार्वजनिक वितरण सेवा, बँका, विवाह सोहळे, अंत्यविधी, यांना लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.