अमळनेर:- शहरातील दंगल किरकोळ कारणावरून झाली असून निरपराध लोकांना अटक करू नका आणि उद्यापासून संचारबंदी काढा अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांना दिल्या आहेत.
किरकोळ कारणावरून दंगल झाली आहे. त्यात दोषींना शिक्षा झाली पाहिजे मात्र निरपराध व्यक्तींना वेठीस धरू नका उगीच दंगलीचा बाऊ करून जनतेत भीती निर्माण केली जात आहे. शहरात संचारबंदी लावून दुकाने व्यवसाय बंद झाल्याने नागरिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे मतदानासाठी सवलत दिली जाते आणि दुसरीकडे सामान्य जनतेला बंदी घातली जाते. सध्या पेरणी चा हंगाम असल्याने बियाणे, खते, शेती साहित्य खरेदी, दुरुस्ती आदी कामे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होत असून गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, बूट चप्पल खरेदी करावी लागते. संचारबंदीमुळे विदयार्थी पालक व शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनने संचारबंदी हटवून बाजारपेठ खुली करावी आणि जनतेने देखील शांतता ठेवावी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.